
Image Source:(Internet)
नागपूर: मुंबईतील मीरा रोडनंतर आता घाटकोपर परिसरातील सागर पार्क सोसायटीत बकरा कुर्बानीच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सागर पार्क सोसायटीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून बकरा कुर्बानी केली जात होती. मात्र, यंदा मध्यरात्री मुंबई महापालिकेने कुर्बानीची परवानगी रद्द केल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर स्थानिकांमध्ये नाराजी पसरली.
सोसायटीतील काही रहिवाशांनी, “आम्हाला सोसायटीत कुर्बानी करायची नाही. महापालिकेने पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, आम्ही तेथे कुर्बानी करू,” अशी भूमिका घेतली. तसेच या वादामुळे सोसायटीचे नाव खराब होऊ नये, अशीही भावना त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणात भूमिका घेत “सोसायटी परिसरात कुर्बानी होऊ देणार नाही,” असा इशारा दिला. मुंबई महापालिकेने काही बकरे ताब्यात घेतल्याचाही दावा त्यांनी केला. “हिंदू रस्त्यावर उतरल्यामुळे प्रशासनाला कारवाई करावी लागली,” असेही सोमय्या म्हणाले.
या पार्श्वभूमीवर राज्य राखीव पोलिस दलासह मोठा पोलीस फौजफाटा सागर पार्क सोसायटी परिसरात तैनात करण्यात आला आहे. पोलिस आणि काही स्थानिकांमध्ये शाब्दिक वाद झाल्याची माहितीही समोर आली आहे.
दरम्यान, राज्याचे मंत्री संजय शिरसाट
यांनीही प्रतिक्रिया देताना, “राहत्या सोसायटीमध्ये अशाप्रकारे कत्तल करणे योग्य नाही. सण साजरा करण्यासाठी प्रशासनाने निश्चित केलेल्या जागांचाच वापर झाला पाहिजे,” असे मत व्यक्त केले.