
Image Source:(Internet)
नागपूर : देशभरातील शेतकरी आणि नागरिक आतुरतेने वाट पाहत असलेल्या मान्सूनच्या आगमनाबाबत नवी अपडेट समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने यापूर्वी 26 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला होता. मात्र वातावरणातील बदलत्या परिस्थितीमुळे हा अंदाज पुढे ढकलला गेला असून आता जूनच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून केरळ किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
केरळमध्ये अजूनही अधिकृत मान्सूनची प्रतीक्षा-
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनची वाटचाल सध्या मंदावलेली असून मोसमी वारे अजूनही अरबी समुद्र परिसरात सक्रिय आहेत. केरळमध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असला तरी त्याला अधिकृत मान्सून म्हणून घोषित करण्यात आलेले नाही. हा पाऊस मान्सूनपूर्व असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
यंदा मान्सून वेळेआधी देशात दाखल होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र सध्याच्या वातावरणीय स्थितीमुळे मान्सूनची आगेकूच नियमित वेळापत्रकानुसारच होत असल्याचे दिसून येत आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्र, कोमोरिन परिसर, अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
1 जूनला केरळात मान्सूनची शक्यता-
सध्याच्या अंदाजानुसार 1 जूनच्या आसपास मान्सून केरळ किनारपट्टीवर अधिकृतरीत्या दाखल होऊ शकतो. केरळ आणि माहे भागात गेल्या काही दिवसांत 11 ते 20 सेंटीमीटरपर्यंत पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, सिक्कीम, आसाम, मेघालय आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्येही मुसळधार पाऊस झाला आहे.
उत्तर भारतात उष्णतेचा कहर-
दुसरीकडे उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत. दिल्लीमध्ये मे महिन्यातील गेल्या 14 वर्षांतील सर्वाधिक उष्ण रात्र नोंदवण्यात आली असून किमान तापमान 32.4 अंश सेल्सिअसवर पोहोचले. देशातील तब्बल 31 शहरांमध्ये तापमान 45 अंशांच्या पुढे गेले आहे. बांदा, ब्रह्मपुरी आणि खजुराहो येथे सर्वाधिक उष्णतेची नोंद झाली.
महाराष्ट्रात उष्णतेसोबत वादळी पावसाचा इशारा-
महाराष्ट्रात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भातील अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूर आणि अकोला येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुंबई, ठाणे, पालघर, यवतमाळ, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट लागू आहे.
याचबरोबर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नाशिक, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोलीसह अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.