सिद्धिविनायक मंदिर परिसराला मिळणार नवे रूप; भाविकांसाठी उभारला जाणार आधुनिक कॉरिडॉर

    26-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिराच्या पुनर्विकास आणि सुशोभीकरण प्रकल्पाला अखेर हिरवा कंदील मिळाला असून, मंदिर परिसराचा संपूर्ण चेहरामोहरा बदलण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे भूमीपूजन पार पडले.

प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सिद्धिविनायक मंदिर परिसर अधिक आकर्षक, सुरक्षित आणि आधुनिक सुविधांनी युक्त होणार आहे. नव्या आराखड्याची माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामाजिक माध्यमांवर प्रकल्पाची छायाचित्रे शेअर केली. भाविकांना अधिक सोयीस्कर आणि आनंददायी दर्शन अनुभव देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मंदिरात दररोज मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता, दर्शन व्यवस्थेमध्ये मोठे बदल करण्यात येणार आहेत. यामध्ये अत्याधुनिक कॉरिडॉर, सुसज्ज प्रतीक्षा व्यवस्था आणि नियोजनबद्ध रांग प्रणाली विकसित केली जाणार आहे. त्यामुळे भाविकांना कमी वेळात आणि अधिक सुलभ पद्धतीने दर्शन घेता येणार आहे.

याशिवाय मंदिर परिसरातील रस्ते, सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता आणि इतर पायाभूत सुविधांचाही मोठ्या प्रमाणावर विकास केला जाणार आहे. भविष्यात सिद्धिविनायक परिसर अधिक सुव्यवस्थित आणि भक्तिमय वातावरणाने परिपूर्ण दिसेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

या भूमीपूजन कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सदा सरवणकर, कालिदास कोळंबकर, प्रसाद लाड, रितू तावडे, संजय घाडी, आचार्य पवन त्रिपाठी तसेच मंदिर न्यासाचे पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.