यशोधरा नगर परिसरात नागरिकांना शांतता व सौहार्द राखण्याचे आवाहन

Image Source:(Internet)
नागपूर : बकरी ईदचा सण शांततापूर्ण आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावा यासाठी नागपूर शहर पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूर शहर पोलीस परिमंडळ क्रमांक ५ अंतर्गत नवनियुक्त डीसीपी अन्नपूर्णा सिंह यांच्या नेतृत्वात यशोधरा नगर पोलीस ठाणे हद्दीत भव्य रूट मार्च आणि पायदळ गस्त काढण्यात आली.
या रूट मार्चमध्ये मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. संवेदनशील भागातून काढण्यात आलेल्या या मार्चद्वारे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दरम्यान, पोलिसांकडून पीए सिस्टिमद्वारे नागरिकांना बकरी ईदचा सण शांततेत साजरा करण्याचे तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने 112 या पोलीस कंट्रोल रूम क्रमांकावर संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले.
डीसीपी अन्नपूर्णा सिंह यांनी सांगितले की, शहरातील शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखणे ही पोलिसांची सर्वोच्च प्राथमिकता असून अफवा पसरविणाऱ्यांवर आणि असामाजिक घटकांवर पोलिसांची करडी नजर आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आपापसातील बंधुभाव कायम ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले.