
Image Source:(Internet)
मुंबई/नागपूर : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नागपूर शहराशी संबंधित एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन नागपूर आणि शहरातील प्रस्तावित बाह्य वळण रस्ता प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीच्या खरेदीवर मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ करण्यास सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे.
हिंगणा तालुक्यातील गोदणी आणि लाडगाव (रीठी) परिसरातील खाजगी जमिनी या प्रकल्पासाठी थेट वाटाघाटी करून खरेदी केल्या जाणार आहेत. शुल्क माफ केल्यामुळे या व्यवहाराचा आर्थिक भार कमी होणार असून जमीन संपादनाची प्रक्रिया अधिक जलद होण्याची अपेक्षा आहे.
या प्रकल्पामुळे नागपूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी होणार असून बाहेरून येणारी जड वाहने शहरात न शिरता थेट वळण मार्गाने पुढे जाऊ शकतील. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार असल्याचे प्रशासनाचे मत आहे.
दरम्यान, त्याच मंत्रिमंडळ बैठकीत इतरही काही निर्णय घेण्यात आले, मात्र नागपूरसाठीचा हा निर्णय विशेष महत्त्वाचा मानला जात आहे कारण याचा थेट परिणाम शहराच्या वाहतूक आणि विकास आराखड्यावर होणार आहे.