नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सलग तिसरी धक्कादायक घटना

Image Source:(Internet)
नागपूर : नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवरी नगर परिसरात रविवारी दुपारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. बंद घरातून तीव्र दुर्गंधी येत असल्याने स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता आई आणि मुलीचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली.
मृतांची ओळख लालवंती टेकचंद चावला (वय ६५) आणि त्यांची मुलगी योगिता चावला (वय ५०) अशी करण्यात आली आहे. दोघीही हिवरी नगरमधील एलआयजी कॉलनीत गेल्या अनेक वर्षांपासून राहत होत्या. घरातून येणाऱ्या असह्य दुर्गंधीमुळे घरमालक राधेश्याम आहुजा यांना संशय आला. त्यांनी नातेवाईक नरेंद्र चावला यांच्याशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना घराचा दरवाजा आतून बंद अवस्थेत आढळला. दरवाजा तोडून आत गेल्यानंतर दोघींचे मृतदेह घरात पडलेले दिसून आले. उष्णतेमुळे मृतदेहांची अवस्था अत्यंत खराब झाली होती. प्राथमिक अंदाजानुसार मृत्यू काही दिवसांपूर्वी झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
तपासादरम्यान लालवंती यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाल्याचे समोर आले. योगिताच्या पतीचाही मृत्यू झाला होता. योगिता मानसिक तणावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. आई-मुलगी एकाकी जीवन जगत असून त्यांचा परिसरातील लोकांशी फारसा संपर्क नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
घराचा दरवाजा आतून बंद असल्यामुळे बाहेरील व्यक्तीच्या हस्तक्षेपाची शक्यता पोलिसांनी सध्या नाकारली आहे. घटनास्थळी आत्महत्येसंदर्भातील कोणतेही पुरावेही आढळले नाहीत. वाढता उकाडा, प्रकृती अस्वास्थ्य किंवा नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत असला तरी नेमके कारण पोस्टमार्टम अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून आवश्यक नमुने आणि पुरावे जप्त केले असून नंदनवन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
दरम्यान, नंदनवन परिसरात काही दिवसांत आई-मुलीच्या मृत्यूची ही तिसरी घटना ठरली आहे. याआधी दर्शन कॉलनी आणि बाबा गाडगे नगर परिसरातही अशाच प्रकारच्या घटना घडल्या होत्या. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.