
Image Source:(Internet)
मुंबई : राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपावरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा सुरू असून, या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा सुरू असल्याने विधान परिषद जागावाटपाचा पेच लवकरच सुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 जागांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत जागांच्या वाटपावरून भाजप आणि शिंदे गटामध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. शिंदे गटाने सात जागांवर दावा कायम ठेवला असून, भाजपकडून मात्र मर्यादित जागा देण्याची भूमिका घेतली गेल्याचे समजते. त्यामुळे महायुतीत अंतर्गत चर्चांना वेग आला आहे.
या बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे उद्या दिल्लीला रवाना होणार आहेत. तेथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार असून, त्यामध्ये अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ठाणे आणि काही महत्त्वाच्या मतदारसंघांवरून दोन्ही पक्षांनी आपापली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. भाजपने काही भागांत संघटनात्मक बळ वाढल्याचा दावा केला असताना, शिंदे गटाने मित्रपक्षांची साथ मिळवत आपली भूमिका अधिक ठाम केली आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीतील जागावाटपाचा फॉर्म्युला नेमका कसा ठरणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.