विदर्भात ‘हीटवेव्ह इमर्जन्सी अलर्ट’; मोबाईलवरील अचानक संदेशाने नागरिकांमध्ये संभ्रम

    26-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मंगळवारी मोबाईलवर आलेल्या ‘इमर्जन्सी हीटवेव्ह अलर्ट’मुळे काही काळ नागरिकांमध्ये भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अचानक मोठ्या आवाजासह आलेल्या या चेतावणी संदेशामुळे अनेकांना सुरुवातीला एखादी गंभीर आपत्ती किंवा सुरक्षेचा धोका निर्माण झाल्याचा भास झाला.

केंद्र सरकारच्या आपत्कालीन सूचना प्रणालीमार्फत पाठविण्यात आलेल्या या अलर्टमध्ये पुढील २४ तासांत विदर्भातील काही भागांमध्ये तीव्र उष्णतेची लाट येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. विशेषतः नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

संदेशात काही भागांमध्ये दिवसभर प्रचंड उकाडा राहण्यासोबतच रात्रीही तापमानात फारशी घट होणार नसल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे आणि आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

मोबाईलवर अचानक वाजलेल्या तीव्र अलर्ट टोनमुळे अनेक नागरिक घाबरले. काहींनी सुरुवातीला भूकंप, युद्धजन्य परिस्थिती किंवा मोठ्या नैसर्गिक आपत्तीची शक्यता असल्याचे समजून चिंता व्यक्त केली. सोशल मीडियावरदेखील या संदेशाचे स्क्रीनशॉट आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

दरम्यान, प्रशासनाने हा संदेश केवळ जनजागृती आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पाठविण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघात, निर्जलीकरण आणि आरोग्याशी संबंधित धोके टाळण्यासाठी नागरिकांना आगाऊ सतर्क करण्याचा हा प्रयत्न असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हवामान विभागाने नागरिकांना दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. भरपूर पाणी पिणे, हलक्या रंगाचे सैल कपडे वापरणे आणि वृद्ध तसेच लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान सातत्याने वाढत असल्याने नागरिकांनी अधिकृत हवामान विभाग आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने म्हटले आहे.