पेट्रोल-डिझेल टंचाईवर सरकार आक्रमक; साठेबाजांविरोधात कठोर कारवाईचा इशारा

    26-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : राज्यात पेट्रोल आणि डिझेल टंचाईच्या चर्चांनी जोर धरला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साठेबाजी करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. इंधनाची मागणी अचानक वाढल्याने प्रशासन सतर्क झाले असून, कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, राज्यात पेट्रोलचा पुरवठा हा प्रत्यक्ष गरजेपेक्षा सुमारे 23 टक्के अधिक केला जात आहे. तरीही काही भागांत टंचाईसारखी परिस्थिती निर्माण होत असल्याने संशय व्यक्त केला जात आहे. डिझेलच्या मागणीत तब्बल 52 टक्क्यांची वाढ झाल्याने सरकारने पुरवठा विभाग आणि गृह विभागाला संयुक्त कारवाईचे निर्देश दिले आहेत.

विशेषतः अकोला जिल्ह्यात डिझेलच्या मागणीत 154 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती त्यांनी दिली. तर काही इतर जिल्ह्यांतही 70 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ नोंदवण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेले इंधन काहीजण व्यावसायिक वापरासाठी वळवत आहेत का, याची चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांना पुरेसा डिझेल पुरवठा मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगत, शेतकऱ्यांच्या नावाखाली साठेबाजी होत असल्यास ती खपवून घेतली जाणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. काही भागांत अचानक 20 ते 30 टक्क्यांनी मागणी वाढल्यामुळे यामागे गैरव्यवहाराची शक्यता नाकारता येत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, खासदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या टीकेलाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. “त्या प्रथमच खासदार झाल्या असून अधिक जबाबदारीने वक्तव्य करणे अपेक्षित आहे. कोणाबद्दल बोलत आहोत याचे भान ठेवले नाही, तर जनता योग्य वेळी उत्तर देईल,” असा टोला त्यांनी लगावला.