विधान परिषद निवडणुकीवर प्रश्नचिन्ह; रोहित पवारांची निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी

    25-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : राज्यात विधान परिषद निवडणुकीची राजकीय धामधूम सुरू असतानाच आता या निवडणुका सध्याच्या परिस्थितीत घेण्याची गरज आहे का, असा सवाल Rohit Pawar यांनी उपस्थित केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील १७ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र राज्यातील वाढती महागाई, इंधन तुटवडा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी होत आहे.

राज्यातील परिस्थिती गंभीर-
रोहित पवार यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना राज्यातील इंधन संकट दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे म्हटले आहे. काही भागांत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून Pune शहरात जमावबंदी लागू करण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला.

अशा परिस्थितीत विधान परिषद निवडणूक घेणे योग्य ठरेल का, याचा विचार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

घोडेबाजारावर कोट्यवधींचा खर्च-
रोहित पवार यांनी पुढे आरोप केला की, या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. रिसॉर्ट पॉलिटिक्स, मतदारांची फोडाफोड आणि राजकीय व्यवहारांवर कोट्यवधी रुपये खर्च होणार असल्याचा दावा त्यांनी केला.

निवडणूक आयोगाने राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन या निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. निवडणुका पुढे गेल्यास सरकारला सामान्य नागरिकांच्या समस्यांकडे अधिक लक्ष देता येईल, असेही त्यांनी म्हटले.

विजय वडेट्टीवारांचाही गंभीर आरोप-

याआधी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीदेखील विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार होणार असल्याचा आरोप केला होता.

त्यांच्या मते, काही नगरसेवकांना मोठ्या पैशांचे आमिष दाखवून एका गटातून दुसऱ्या गटात नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. “राजकारणात फोडाफोडीचा उत्सव सुरू आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.