
Image Source:(Internet)
मुंबई : देशभरात सध्या कॉकरोच जनता पार्टी चर्चेचा विषय ठरत आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांचा उल्लेख “झुरळ” असा केल्याच्या वादानंतर अभिजीत दिपके यांनी या नव्या पक्षाची स्थापना केली. सोशल मीडियावर अल्पावधीतच या पक्षाला मोठा प्रतिसाद मिळाला असून आता काही प्रमुख नेते आणि समाजसेवकांनीही या पक्षाला समर्थन दर्शवले आहे.
प्रकाश आंबेडकरांची दिपके कुटुंबीयांना साथ-
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. यावेळी त्यांनी अभिजीत दिपके यांचे वडील भगवान दिपके यांच्याशी चर्चा करत, कोणतीही अडचण आल्यास संपर्क साधण्याचे आश्वासन दिले.
या भेटीनंतर कॉकरोच जनता पार्टीला राजकीय पातळीवरही पाठिंबा मिळत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. यापूर्वीही प्रकाश आंबेडकर यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत, संबंधित विधानाबाबत स्पष्ट भूमिका मांडण्याची गरज असल्याचे म्हटले होते. बेरोजगार तरुणांविषयी वापरण्यात आलेल्या शब्दांमुळे अनेक युवकांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
अण्णा हजारेंचाही पाठिंबा-
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीदेखील कॉकरोच जनता पार्टीला समर्थन दिले आहे. युवकांना “झुरळ” अशी उपमा देण्यामागील उद्देश काय होता, याचा विचार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच, त्या नावाने स्थापन झालेल्या पक्षामागे देशातील तरुण मोठ्या संख्येने उभे राहत आहेत, ही बाब महत्त्वाची असल्याचे अण्णा हजारे म्हणाले. “नाव योग्य वाटत नसले तरी युवकांचा वाढता पाठिंबा ही मोठी गोष्ट आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
युवा शक्ती हीच देशाची ताकद-
अण्णा हजारे यांनी पुढे बोलताना युवा शक्ती ही राष्ट्राची खरी ताकद असल्याचे सांगितले. तरुणांकडे दुर्लक्ष करून देशाचा विकास शक्य नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यासोबतच त्यांनी केंद्रातील लोकपाल आणि राज्यातील लोकायुक्त कायद्याच्या अंमलबजावणीवरही प्रश्न उपस्थित केले. कायदा मंजूर होऊनही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने पुन्हा आंदोलनाची गरज भासणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सोशल मीडियावर चर्चा रंगली-
कॉकरोच जनता पार्टीची घोषणा झाल्यानंतर सोशल मीडियावर या पक्षाबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काही जण या आंदोलनाला बेरोजगार तरुणांचा आवाज मानत आहेत, तर काहींनी या नावावरून टीकाही केली आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणामुळे बेरोजगारी, युवकांचे प्रश्न आणि राजकीय भाष्य यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.