
Image Source:(Internet)
मुंबई : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते तसेच मुंबई पोलीस आयुक्तांना विशेष सूचना दिल्या आहेत. गोवंश हत्या बंदी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
विशेषतः मालेगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, सातारा, धाराशिव, धुळे आणि सोलापूर या भागांमध्ये अधिक खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी गोवंश हत्या बंदी कायद्याचे उल्लंघन होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.
तसेच गोरक्षकांवर कोणत्याही प्रकारचे हल्ले होऊ नयेत, याचीही काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बकरी ईददरम्यान राज्यात शांतता कायम राहावी, यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, राज्य शासनाकडून यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले असून प्रत्येक पोलीस ठाण्याला त्याबाबत सूचना पाठवण्यात आल्या आहेत. मंत्री नितेश राणे यांनीदेखील गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
संशयित कत्तलखान्यांवर धाडी टाकण्याचे काम सुरू असून पोलिसांकडून विविध ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील भागांमध्ये विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.