
Image Source:(Internet)
नवी दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे आता महागाईचा भडका उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या दहा दिवसांत तेल कंपन्यांनी चौथ्यांदा इंधन दर वाढवले असून त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. वाहतूक खर्च वाढल्याने लवकरच अन्नधान्य, दूध, भाज्या, औषधे आणि प्रवास खर्चही वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दहा दिवसांत चौथ्यांदा दरवाढ-
१५ मे रोजी तब्बल चार वर्षांनंतर तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेल दरात वाढ केली होती. त्यावेळी प्रतिलिटर ३ रुपयांनी दर वाढवण्यात आले. त्यानंतर १९ मे आणि २३ मे रोजीही दरवाढ करण्यात आली. आता २५ मे रोजी पुन्हा पेट्रोलमध्ये २.६१ रुपये तर डिझेलमध्ये २.७१ रुपये प्रतिलिटर वाढ करण्यात आली आहे.
या वाढीनंतर मुंबई मध्ये पेट्रोलचा दर १११ रुपयांच्या पुढे गेला असून न्यू दिल्ली मध्ये पेट्रोलने शंभरी पार केली आहे.
महागाईची चिन्हे स्पष्ट-
इंधन दरवाढीनंतर विविध क्षेत्रांवर त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. पहिल्या दरवाढीनंतरच Amul आणि Mother Dairy यांसारख्या कंपन्यांनी दूधाच्या किमती वाढवल्या. काही शहरांमध्ये ब्रेड आणि इतर खाद्यपदार्थही महाग झाले आहेत.
दरम्यान, रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनीही भाडेवाढीची मागणी सुरू केली आहे.
वाहतूक खर्च वाढल्याने सर्व वस्तूंवर परिणाम-
डिझेल दरवाढीमुळे मालवाहतूक क्षेत्रावर मोठा ताण निर्माण झाला आहे. ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेलफेयर असोसिएशनने वाहतूक खर्च वाढत असल्याचे सांगत २० मेपासून इंधन समायोजन शुल्क लागू केले आहे. त्यामुळे मालवाहतुकीचे दर वाढणार असून त्याचा परिणाम थेट बाजारभावांवर होणार आहे.
ट्रकच्या एकूण खर्चापैकी जवळपास ६५ टक्के खर्च हा डिझेलवरच होत असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. आतापर्यंत डिझेल सुमारे ७ रुपयांनी महागल्याने वाहतूकदारांनाही दरवाढ करावी लागत आहे.
सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार फटका-
वाहतूक खर्च वाढल्याने एफएमसीजी कंपन्या, किरकोळ विक्रेते, ई-कॉमर्स कंपन्या आणि अन्न पुरवठादार यांचा लॉजिस्टिक खर्च वाढणार आहे. हा अतिरिक्त भार अखेरीस ग्राहकांवर टाकला जाण्याची शक्यता आहे.
यामुळे येत्या काही दिवसांत भाज्या, फळे, दूध, डेअरी उत्पादने आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.