TCS प्रकरणाला नवे राजकीय वळण; निदा खानच्या समर्थनार्थ ‘मायनॉरिटी डिफेन्स कमिटी’ सक्रिय

    25-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

टीसीएस कंपनीत कार्यरत असलेल्या अविवाहित तरुणीवरील कथित बलात्कार आणि धर्मांतर प्रकरणात आता मोठा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानसह सात आरोपींच्या समर्थनार्थ आता ‘मायनॉरिटी डिफेन्स कमिटी’ मैदानात उतरली आहे. दरम्यान, फरार आरोपीला आश्रय दिल्याचा आरोप असलेले एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल आज नाशिक पोलिसांसमोर हजर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली असतानाच इस्लाम पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी आमदार आसिफ शेख यांनी आरोपींच्या कुटुंबीयांची भेट घेत पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. टीसीएस प्रकरण राजकीय हेतूने पुढे आणले जात असून, ‘खरात प्रकरण’ दाबण्यासाठी याचा वापर होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. निदा खानवर लावण्यात आलेले आरोप खोटे असल्याचा दावा करत न्यायालयीन प्रक्रियेत स्वतः उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पोलिसांच्या तपासात काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. संशयित निदा एजाज खान आणि तिच्या नातेवाईकातील व्हॉट्सॲप चॅट पोलिसांच्या हाती लागले असून, त्यातून पीडित तरुणीचे नाव बदलून ‘हानिया’ ठेवण्यात आल्याचा दावा तपास यंत्रणांकडून केला जात आहे. या चॅटमुळे कथित कटाचा तपास अधिक वेगाने पुढे सरकत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे, फरार आरोपीला मदत केल्याच्या आरोपाखाली एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्याविरोधात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक गुन्हे शाखेने यापूर्वी संभाजीनगरमध्ये जाऊन त्यांचा शोध घेतला होता, मात्र ते सापडले नव्हते. आता पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर मतीन पटेल नरमाईची भूमिका घेत असल्याची चर्चा असून, ते आज पोलिसांसमोर शरण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या संपूर्ण प्रकरणात पुढे आणखी कोणते खुलासे होणार आणि पोलिस तपास कोणत्या दिशेने जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.