
Image Source:(Internet)
नवी दिल्ली : देशभरात दररोज कोट्यवधी प्रवासी Indian Railways च्या माध्यमातून प्रवास करत असतात. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि शिस्तबद्ध राहावा यासाठी रेल्वे प्रशासनाने काही कठोर नियम लागू केले आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास प्रवाशांना आर्थिक दंडासोबतच कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागू शकते.
रेल्वे प्रवासादरम्यान मद्यपान करणे किंवा नशेत गोंधळ घालणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. स्टेशन परिसरात किंवा रेल्वे डब्यात दारूचे सेवन करताना आढळल्यास संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाऊ शकते. सहप्रवाशांसोबत वाद घालणे किंवा त्रासदायक वर्तन केल्यास जेलची शिक्षाही होण्याची शक्यता असते.
याशिवाय, मोबाईलवर मोठ्या आवाजात बोलणे किंवा रात्री उशिरापर्यंत गोंधळ घालणेही प्रवाशांना महागात पडू शकते. अनेकदा अशा प्रकारामुळे इतर प्रवाशांच्या झोपेचा आणि आरामाचा भंग होतो. तक्रार प्राप्त झाल्यास रेल्वे प्रशासन संबंधित प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करू शकते.
रेल्वेमधील मधल्या बर्थबाबतही स्पष्ट नियम आहेत. रात्री ठराविक वेळेतच मिडल बर्थ वापरण्याची परवानगी असते. त्यानंतर तो खाली करून इतर प्रवाशांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक असते. नियम मोडल्यास वाद निर्माण होऊ शकतो आणि तक्रार झाल्यास कारवाईही होऊ शकते.
प्रवाशांनी रेल्वेचे नियम पाळल्यास प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर होऊ शकतो, असे प्रशासनाकडून वारंवार सांगितले जात आहे.