अशोक खरात ईडीच्या जाळ्यात;१४ कोटींची रोकड, आलिशान गाड्या अन् सोन्याचा साठा

    25-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नाशिक : लोकांना आध्यात्मिक उपचारांच्या नावाखाली फसवून कोट्यवधी रुपयांची उकळपट्टी करणाऱ्या अशोक खरात याच्यावर Enforcement Directorate अर्थात ईडीने मोठी कारवाई केली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या खरातला मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयाने सात दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.

अशोक खरातवर महिलांचे लैंगिक शोषण, बलात्कार, धमकावून खंडणी उकळणे आणि फसवणुकीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तपासादरम्यान त्याच्या संपत्तीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

स्वतःला ‘दैवी शक्ती’ असल्याचा दावा-
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, अशोक खरात स्वतःला भगवान शंकराचा अवतार असल्याचे सांगत असे. अलौकिक शक्ती, अघोरी विद्या आणि काळ्या जादूच्या भीतीचा आधार घेत तो लोकांना जाळ्यात अडकवत होता. मृत्यूची भीती दाखवून आणि धार्मिक विधींच्या नावाखाली त्याने अनेकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचा आरोप आहे.

एका व्यक्तीकडूनच ५ कोटींपेक्षा जास्त वसुली-
ईडीच्या तपासात एका तक्रारदाराकडून तब्बल ५.६२ कोटी रुपये उकळल्याचे समोर आले आहे. या पैशांतून खरातने महागडी Mercedes-Benz कार खरेदी केली, परदेश दौरे केले, अमेरिकेत उपचार घेतले तसेच फार्महाऊस उभारल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

ईडीच्या छाप्यात मोठा साठा जप्त-
१३ एप्रिल ते १८ मेदरम्यान ईडीने अशोक खरात आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या घरांवर, कार्यालयांवर आणि बँक लॉकरवर छापेमारी केली. या कारवाईत जवळपास १३.९२ कोटी रुपयांची रोकड, ५,५०० अमेरिकन डॉलर्स, सुमारे १.१२ कोटींचे सोने-चांदीचे दागिने, २.२५ कोटींच्या ठेवी, महागडी वाहने आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली.

तसेच डिजिटल उपकरणे आणि बेनामी मालमत्तेशी संबंधित नोंदीही ईडीच्या हाती लागल्या आहेत.

बनावट खात्यांद्वारे पैशांचा व्यवहार-
गुन्ह्यातून मिळालेला पैसा लपवण्यासाठी खरातने विविध पतसंस्था आणि बँकांमध्ये बनावट खाती उघडल्याचा आरोप आहे. अनेक खातेदारांना त्यांच्या नावावर खाते सुरू असल्याची माहितीही नव्हती. या खात्यांमधून मोठ्या प्रमाणात रोकड जमा करून ती मुदत ठेवीत बदलली जात होती आणि नंतर पुन्हा रोख स्वरूपात काढली जात असल्याचे तपासात उघड झाले आहे.

या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध ईडीकडून सुरू असून अनेक आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जात आहे.