
Image Source:(Internet)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा उफाळून आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काही दिवसांपूर्वी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीबाबत निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या पत्रामुळे पक्षातील मतभेद उघड झाले होते. आता त्यात आणखी एका नव्या घडामोडीची भर पडल्याने चर्चांना उधाण आले आहे.
पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची नावे नमूद करण्यात आली होती. मात्र त्यांच्या पदांचा स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे पक्षात नाराजी असल्याचे बोलले जात होते.
यानंतर प्रफुल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. या बैठकीला सुनील तटकरे देखील उपस्थित होते. या भेटीदरम्यान पक्षातील काही मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती.
तसेच, प्रफुल पटेल यांनी पार्थ पवार यांच्याबाबत नाराजी व्यक्त करत त्यांची तक्रार शरद पवारांकडे केल्याचीही चर्चा होती. मात्र त्यावर शरद पवार यांनी कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिली नव्हती.
दरम्यान, आता पक्षातील एका वरिष्ठ नेत्याला थेट राजीनामा देण्याचा सल्ला देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या घडामोडींमुळे अजित पवार गटातील अंतर्गत समीकरणांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली असून राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.