रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण दुर्घटना; स्कॉर्पिओ 700 फूट दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू

    25-May-2026
Total Views |
महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर मध्यरात्रीचा थरार
Image Source:(Internet)

रायगड : रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवरील धोकादायक समजल्या जाणाऱ्या आंबेनळी घाटात रविवारी रात्री भीषण अपघात झाला. महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर एक स्कॉर्पिओ गाडी तब्बल 500 ते 700 फूट खोल दरीत कोसळल्याने आठ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त स्कॉर्पिओ सातारा जिल्ह्यातील असल्याचे समजते. गाडीत सातारा, आसगाव आणि कोरेगाव परिसरातील पर्यटक प्रवास करत होते, अशी माहिती समोर येत आहे. हे सर्वजण कोकण किंवा महाबळेश्वर परिसरात फिरण्यासाठी गेले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस, स्थानिक प्रशासन, ट्रेकर्स आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, खोल दरी आणि अत्यंत कठीण भूप्रदेशामुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत. रात्रीच्या अंधारामुळे शोधमोहीम मंदावली होती. आतापर्यंत दोन मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले असून उर्वरित प्रवाशांचा शोध सुरू आहे.

आंबेनळी घाट हा राज्यातील सर्वाधिक धोकादायक घाटांपैकी एक मानला जातो. येथे यापूर्वीही अनेक भीषण अपघात झाले आहेत. या दुर्घटनेमुळे 2018 मधील भीषण बस अपघाताच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत. त्यावेळी कोकण कृषी विद्यापीठाची बस याच घाटात दरीत कोसळून 30 जणांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.