
Image Source:(Internet)
मुंबई : यंदाच्या खरीप हंगामापूर्वीच राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. राज्यात यावर्षी एल-निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता असून सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी आज खरीप हंगामाच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर ही माहिती दिली.
मुख्यमंत्री म्हणाले की, हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा राज्यात दीर्घकालीन सरासरीच्या सुमारे ८८ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र हा पाऊस सर्व भागात समान राहणार नाही. विशेषतः पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात एल-निनोचा प्रभाव अधिक जाणवू शकतो.
यंदा पावसाचा पॅटर्नही वेगळा राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जूनमध्ये तुलनेने चांगला पाऊस होईल, मात्र जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण हळूहळू कमी होत जाण्याची शक्यता आहे. शिवाय दोन पावसांच्या सरींमध्ये मोठा खंड पडू शकतो. त्यामुळे पिकांवर ताण निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर सरकारने जलसंधारण आणि ‘जलयुक्त शिवार’सारखी कामे वेगाने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. पावसातील खंडामुळे पिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी जिल्हानिहाय नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांनी २०१५ च्या एल-निनो वर्षाची आठवण करून दिली. त्या वर्षी मराठवाड्यात तब्बल ३९ टक्के पावसाची तूट झाली होती. अनेक भागांत गंभीर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. यंदाही तशी परिस्थिती उद्भवल्यास त्यासाठी आधीपासून तयारी ठेवण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, खरीप हंगामासाठी पीक कर्ज, बियाणे, खतांचा पुरवठा आणि शेतकऱ्यांना आवश्यक मदत याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. हवामानातील बदल लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांचा विचार करावा, असे आवाहन तज्ज्ञांकडून केले जात आहे.