
नागपूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननाच्या प्रकरणाने आता राजकीय रंग घेतला असून, या संपूर्ण वादात स्थानिक टिप्पर आणि ट्रक चालकांना अन्यायकारक कारवाईला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने शेकडो टिप्पर मालकांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत हस्तक्षेपाची मागणी केली.
भिवापूर, उमरेड आणि रामटेक भागात गेल्या काही दिवसांपासून रेती घाटांवरून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. रेती माफिया आणि राजकीय वर्तुळातील संघर्षात सर्वसामान्य ट्रान्सपोर्टर अडकत असल्याचा दावा आंदोलकांनी केला.
उद्धव गटाचे नेते नितीन तिवारी यांच्या नेतृत्वाखाली टिप्पर मालक मोठ्या संख्येने नियोजन भवन येथे जमले. त्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी प्रशासनाने मोठ्या अवैध रेती व्यवसायिकांवर कारवाई करण्याऐवजी छोट्या वाहनधारकांना लक्ष्य केल्याचा आरोप करण्यात आला.
स्थानिक चालक आणि ट्रान्सपोर्टरांच्या रोजगारावर संकट ओढवल्याचा मुद्दाही आंदोलकांनी उपस्थित केला असून, प्रशासनाने निष्पक्ष कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.