
Image Source:(Internet)
मुंबई : वाढत्या डिझेल दरांमुळे आर्थिक तणावात सापडलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवासी भाडेवाढीचे संकेत दिले आहेत. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सोमवारी याबाबत माहिती देताना, अंतिम निर्णय राज्य परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतरच घेतला जाईल, असे स्पष्ट केले.
डिझेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीनंतर सरनाईक यांनी सांगितले की, महामंडळाला दररोज सुमारे १०.८७ लाख लिटर डिझेलची आवश्यकता असते. इंडियन ऑइलकडून मिळणाऱ्या डिझेलचा दर आठवडाभरात प्रतिलिटर ८८.२१ रुपयांवरून ९१.३१ रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
प्रतिलिटर ३ रुपये १० पैशांची वाढ झाल्याने महामंडळाच्या खर्चात मोठी भर पडली असून आर्थिक ताण अधिक वाढला आहे.
आर्थिक संकट अधिक गडद
एसटी महामंडळ आधीच आर्थिक अडचणींशी झुंज देत असून, एप्रिल २०२६मध्ये महामंडळाला तब्बल ७६ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागल्याचेही सरनाईक यांनी नमूद केले. वाढत्या इंधन खर्चामुळे भविष्यात भाडेवाढ अपरिहार्य ठरू शकते, असे संकेत त्यांनी दिले. मात्र, ग्रामीण भागातील सर्वसामान्य प्रवाशांवर अतिरिक्त भार पडू नये यासाठी शासन विविध पर्यायांचा विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.
इंधन बचत, ई-बसचा वाढता वापर, खर्च नियंत्रण आणि महसूलवाढ यांसारख्या उपाययोजनांवर भर दिला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण भागासाठी मोठे आव्हान
ग्रामीण महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एसटी ही जीवनवाहिनी मानली जाते. त्यामुळे सेवा कायम ठेवत आर्थिक संतुलन साधणे हेच सध्या महामंडळासमोरील सर्वात मोठे आव्हान असल्याचे परिवहन मंत्र्यांनी म्हटले.
“दरवाढ पाच रुपयांच्या पटीतच करा”
दरम्यान, आगामी तिकीट दरवाढ पाच रुपयांच्या पटीतच करण्यात यावी, अशी मागणी एसटी कामगार संघटनेने परिवहन विभागाकडे केली आहे. सुट्ट्या पैशांच्या समस्येमुळे चालक, वाहक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे संघटनेने निदर्शनास आणले.
एसटी कामगार संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे आणि अध्यक्ष संदीप शिंदे यांनी अपर मुख्य सचिव (परिवहन) संजय सेठी यांची भेट घेत निवेदन सादर केले. तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनाही यासंदर्भात मागणीपत्र देण्यात आले.
संघटनेच्या माहितीनुसार, २०१८ आणि २०२१ मधील तिकीट दरवाढ पाच रुपयांच्या पटीत करण्यात आली होती. मात्र, २५ जानेवारी २०२५ रोजी झालेली विषम दरवाढ तिकीट व्यवहारात गोंधळ निर्माण करणारी ठरल्याचा दावा संघटनेने केला आहे.