
Image Source:(Internet)
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच पार पडलेल्या युरोप दौऱ्यातील एक व्हिडीओ सध्या राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे. नॉर्वेमध्ये पंतप्रधान जोनास गहर स्टोर यांच्यासोबत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान माध्यम स्वातंत्र्य आणि मानवाधिकारांच्या मुद्द्यावरून विचारण्यात आलेल्या प्रश्नांनंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.
नॉर्वे दौऱ्यात एका मुक्त पत्रकाराने पंतप्रधान मोदींना भारतातील माध्यम स्वातंत्र्याबाबत प्रश्न विचारला होता. त्यानंतर भारतीय अधिकाऱ्यांच्या स्वतंत्र पत्रकार परिषदेत एका महिला पत्रकारानेही भारतातील मानवाधिकार उल्लंघन आणि पत्रकारांना प्रश्न विचारण्याच्या स्वातंत्र्याबाबत सवाल उपस्थित केले.
“भारतावर आम्ही विश्वास का ठेवावा? भारतातील मानवाधिकार उल्लंघन थांबवण्याची हमी देता येईल का? भारतीय पंतप्रधान पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देतील का?” असे प्रश्न संबंधित पत्रकाराने उपस्थित केले. यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव सीबी जॉर्ज यांनी भूमिका स्पष्ट करत उत्तर दिले.
दरम्यान, संबंधित महिला पत्रकाराने सोशल मीडियावर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली. “नॉर्वेसारख्या देशात येऊनही भारतीय पंतप्रधान पत्रकारांसमोर बोलले नाहीत, अशी अपेक्षा नव्हती,” असे तिने म्हटले.
यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही हा व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान मोदींवर टीका केली. “प्रश्नांची उत्तरे न देता पंतप्रधानांनी पळ काढला. हे देशासाठी लाजिरवाणे आहे,” अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली.
या घटनेनंतर सोशल मीडियावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची जोरदार चर्चा रंगली आहे.