
Image Source:(Internet)
मुंबई : देशभरात वाढत्या उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी हवामान विभागाकडून दिलासादायक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार नैऋत्य मान्सून वेगाने पुढे सरकत असून, 26 मे रोजी केरळ किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर काही दिवसांतच देशातील विविध भागांत मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान खात्याने मंगळवारी देशातील अनेक राज्यांसाठी वादळी पाऊस, सोसाट्याचे वारे, धुळीचे वादळ आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा जारी केला आहे. जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये पुढील काही दिवस हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता असून, या भागांत ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात.
अंदमान-निकोबार बेटांवर मान्सूनचा प्रभाव अधिक तीव्र झाला असून २४ मेपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र परिसरात तयार झालेल्या अनुकूल वातावरणामुळे महाराष्ट्रासह मध्य भारतात पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रात ‘पावसाची एन्ट्री’ची चिन्हे-
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत पुढील काही दिवसांत पावसाची हजेरी लागू शकते. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि घाटमाथ्यावरील भागात जोरदार सरींचा अंदाज आहे. तर विदर्भातील यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांतही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटक परिसरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने हवामानात बदल जाणवत आहे. काही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्टही जारी केला आहे.
विदर्भात उष्णतेचा तडाखा कायम-
दरम्यान, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अद्याप उष्णतेची तीव्र लाट कायम आहे. तापमानामुळे नागरिकांसह पशू-पक्ष्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र मान्सूनपूर्व पावसाच्या हालचाली वाढल्यास पुढील आठवड्यात तापमानात काही प्रमाणात घट होऊन वातावरणात गारवा निर्माण होण्याची शक्यता आहे.