उल्हासनगरात ‘लव्ह जिहाद’चा आरोप; खोटं नाव सांगून लग्न, छळप्रकरणी तिघांना अटक

    19-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

उल्हासनगर : उल्हासनगरात कथित ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण समोर आले असून, खोटे नाव सांगून एका हिंदू तरुणीशी विवाह केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. लग्नानंतर धर्माशी संबंधित सक्ती करत मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याची तक्रार महिलेने पोलिसांकडे दिली आहे.

पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपीने स्वतःचे नाव “विजय वर्मा” सांगत तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले आणि नंतर विवाह केला. मात्र लग्नानंतर आरोपीने तिला बिहार येथे नेले. तिथे बुरखा आणि हिजाब घालण्यास भाग पाडले तसेच गोमांस खाण्याची सक्ती करत छळ केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

तसेच पतीच्या कुटुंबीयांकडून मारहाण आणि विनयभंगाचा प्रयत्न झाल्याचाही दावा तिने केला आहे. या दाम्पत्याला तीन मुले असल्याची माहिती समोर आली आहे.

दुसऱ्या लग्नानंतर घराबाहेर काढल्याचा आरोप-
पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी पतीने दुसरे लग्न केल्यानंतर तिला घराबाहेर काढले. त्यानंतर आईकडे राहत असतानाही आरोपींकडून धमक्या आणि तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी इम्रान शेख, सलमान शेख आणि एका अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिली.