नागपुरात आठवले यांचा विकास व कल्याण योजनांवर भर; दिव्यांग, विद्यार्थी योजनांचा उल्लेख

    19-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : नागपूर येथील रविभवन येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधत सामाजिक न्याय, आरक्षण, शिक्षण, महिला प्रतिनिधित्व आणि राज्यातील राजकीय परिस्थितीवर आपली भूमिका स्पष्टपणे मांडली.

या वेळी त्यांनी दत्ता मेघे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधल्याचे सांगितले. “दत्ता मेघे यांच्याशी आमचे नेहमीच निकटचे संबंध राहिले आहेत. ते महाराष्ट्रातील एक दिलदार व्यक्तिमत्त्व होते,” असे आठवले यांनी नमूद केले.

केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा उल्लेख करताना त्यांनी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू असल्याची माहिती दिली. तसेच अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दलित व्यक्तीच्या हत्येप्रकरणी पीडित कुटुंबाला ८ लाख रुपयांची आर्थिक मदत व कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याची तरतूद असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अंतरजातीय विवाहाला पाठिंबा देताना त्यांनी सांगितले की, “दलित आणि सवर्ण समाजातील दरी कमी करण्यासाठी समाजाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.” यासोबतच रमाई आवास योजना, उज्ज्वला योजना, विद्यार्थी वसतिगृह योजना आणि दिव्यांग कल्याण योजना प्रभावीपणे राबवल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

नागपूर जिल्ह्यात सुमारे ५३ हजार दिव्यांग नागरिक असल्याचे सांगत प्रत्येक जिल्ह्यात वृद्धाश्रम सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

राजकीय घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी असलेल्या रमेश आनामुले यांची आरपीआय महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचे सांगितले. तसेच महिला आरक्षण विधेयकाला अपेक्षित पाठिंबा न मिळाल्याबाबत त्यांनी खेद व्यक्त केला.

२०२९ मध्ये पुन्हा NDA सरकार सत्तेत येईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. तसेच मोदी यांच्या सूचनेनुसार परदेश दौरे कमी करून देशांतर्गत विकास व जनसंपर्कावर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.