NEET वाद सुप्रीम कोर्टात पुन्हा तापला; NTA कडून परीक्षा काढून घेण्याची मागणी

    19-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : देशभरात गाजत असलेल्या NEET परीक्षेच्या वादात आता आणखी एक मोठी घडामोड समोर आली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते आलोक शर्मा आणि प्रिया शर्मा यांनी सुप्रीम कोर्टात नवी याचिका दाखल करत NEET परीक्षा राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) ऐवजी स्वतंत्र आणि पारदर्शक यंत्रणेमार्फत घेण्याची मागणी केली आहे.

या याचिकेत NEET परीक्षेदरम्यान झालेल्या कथित गैरव्यवहार, पेपरफुटीचे आरोप आणि परीक्षा प्रक्रियेवरील विश्वासार्हतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. परीक्षेतील गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांना मानसिक तणावासोबतच आर्थिक फटकाही बसल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.

तसेच, रद्द किंवा वादग्रस्त ठरलेल्या परीक्षेमुळे प्रभावित विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणीही सुप्रीम कोर्टाकडे करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावी, अशीही विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

दरम्यान, NEET परीक्षेभोवती निर्माण झालेल्या वादामुळे देशभरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये अस्वस्थता वाढली असून, सुप्रीम कोर्टाच्या पुढील सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.