भोंदूबाबा अशोक खरातच्या अडचणीत वाढ; ईडीला अटकेची कोर्टाकडून परवानगी

    19-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नाशिक : महिलांची फसवणूक, लैंगिक अत्याचार आणि कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांमध्ये अडकलेल्या नाशिकच्या कथित भोंदूबाबा अशोक खरात यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाला (ED) अखेर खरातला अटक करण्यासाठी विशेष पीएमएलए न्यायालयाने परवानगी दिली आहे.

नाशिकहून खरातला मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाच्या मंजुरीनंतर आता ईडीकडून त्याला अधिकृतरीत्या अटक केली जाणार असून, पुढील चौकशीसाठी बुधवारी सकाळी ११.३० वाजता रिमांडसाठी पुन्हा कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

दरम्यान, नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या मूळ गुन्ह्याच्या आधारे ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. राजेंद्र जासूद यांनी दाखल केलेल्या तक्रारीत पूजा-अर्चा आणि दैवी शक्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकेच नव्हे, तर खरातच्या फार्महाऊससाठी महागडे फर्निचरही तक्रारदाराच्या पैशातून खरेदी केल्याचा दावा करण्यात आला आहे.

६९ बँक खात्यांचा तपासात उलगडा-
ईडीच्या तपासात अशोक खरातने विविध व्यक्तींच्या कागदपत्रांच्या आधारे तब्बल ६९ बँक खाती उघडल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी सुमारे ६० खाती तो स्वतः हाताळत असल्याचा दावा तपास यंत्रणेने न्यायालयात केला. या खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचेही तपासात उघड झाले आहे.

तसेच ‘राहता बँक’ आणि ‘समता नागरी सहकारी बँक’मधील खात्यांद्वारेही मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. ‘पोफळे’ नावाच्या व्यक्तीकडूनही मोठी रक्कम खरात नॉमिनी असलेल्या खात्यांमध्ये जमा झाल्याची माहिती ईडीने कोर्टात दिली.

आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता-
या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर मनी लाँड्रिंग झाल्याचा संशय व्यक्त करत ईडीने अधिक चौकशीसाठी कोठडीची मागणी केली आहे. तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे आणखी फसवणुकीचे प्रकार आणि आर्थिक व्यवहार उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.