चाळीस कोटींच्या लाच प्रकरणाने आरटीओ विभाग हादरला; पदोन्नतीवर गंभीर आरोप, एसीबीकडे तक्रार

    18-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

पुणे : राज्याच्या परिवहन विभागात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप उघडकीस आले असून, ‘आरटीओ’तील पदोन्नती प्रक्रियेत नियमांना डावलून कोट्यवधींची वसुली झाल्याचा धक्कादायक दावा समोर आला आहे. अप्पर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांच्यावर तब्बल ४० कोटी रुपयांच्या लाचेचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

न्यायालयात आरोपपत्र दाखल असलेल्या आणि गंभीर गुन्ह्यांचा सामना करणाऱ्या काही अधिकाऱ्यांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पदावर पदोन्नती देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) आणि दहशतवादविरोधी पथकाकडे तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीत आणखी एक गंभीर दावा करण्यात आला असून, या कथित बेकायदा वसुलीतून जमा होणारा पैसा ‘शहरी नक्षलवाद्यांना’ आर्थिक मदत म्हणून दिला जात असल्याचे म्हटले आहे. तसेच वाहन चोरीच्या प्रकरणात अटकेत असलेले श्रीकृष्ण नकाते, तसेच स्वप्नील माने आणि सिद्धार्थ ठोके यांसारख्या अधिकाऱ्यांना नियम धाब्यावर बसवून पदोन्नती दिल्याचा आरोपही तक्रारीत नमूद आहे.

दरम्यान, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्याकडे अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार आलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. मात्र, पुरावे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

तर दुसरीकडे, तक्रारदार गजेंद्र पाटील यांनी आपल्याकडे कॉल रेकॉर्डिंगसह आर्थिक व्यवहारांचे पुरावे असल्याचा दावा करत सखोल चौकशीची मागणी केली आहे.

शासन निर्णयाचा भंग झाल्याचा आरोप
३० ऑगस्ट २०१८ च्या शासन निर्णयानुसार, चौकशी सुरू असलेल्या, निलंबित किंवा फौजदारी खटला प्रलंबित असलेल्या अधिकाऱ्यांची पदोन्नती रोखणे बंधनकारक आहे. मात्र या नियमांकडे दुर्लक्ष करून पदोन्नती देण्यात आल्याचा आरोप होत आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे परिवहन विभागातील पदोन्नती प्रक्रियेतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, चौकशीची मागणी अधिक तीव्र झाली आहे.