लासलगावमध्ये शेतकऱ्यांशी संवाद; नाफेडवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

Image Source:(Internet)
नाशिक : कांद्याच्या घसरलेल्या दरांमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आमदार Rohit Pawar यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारवर जोरदार निशाणा साधला. लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी २६ मे रोजी “रास्ता रोको” आंदोलनाचा इशारा दिला.
रोहित पवार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पाहताना त्यात राजकारण होता कामा नये. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्व नेत्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची गरज आहे. कांद्याला सध्या केवळ ३ ते ५ रुपये प्रतिकिलो दर मिळत असून उत्पादन खर्च मात्र प्रचंड वाढला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याचे त्यांनी सांगितले.
लासलगाव बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर- कांद्याची विक्री होत असताना शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मागील वेळी सरकारने जाहीर केलेल्या २०० रुपयांच्या कांदा अनुदानापैकी केवळ ५० रुपयेच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. उर्वरित १५० रुपयांचे काय झाले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
यावेळी त्यांनी नाफेडवर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप करत, बाजार समित्यांना विश्वासात न घेता कांदा खरेदी केल्याचा दावा केला. “नाफेडमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. ‘खरात’ फेम भोंदू बाबानेदेखील नाफेडमार्फत पैसा खाल्ला,” असा आरोप त्यांनी केला.
शेतकऱ्यांनी स्थानिक नेत्यांकडे वारंवार मागणी करून आंदोलन सुरू केले असून, आजचे आंदोलन हे केवळ एक टक्का असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “गरज पडल्यास नाशिकहून दिल्लीकडे जाणारा रस्ता बंद करू,” असा इशारा देत २६ मे रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
सरकारने शेतकऱ्यांसाठी शाश्वत धोरण आणावे, अशी मागणी करताना त्यांनी स्मार्ट सिटी भागांमध्ये बाहेरून कांदा पाठवला जात असल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नसल्याचा आरोप केला. बाजार समित्यांना विश्वासात घेऊन कांद्याचे दर ठरवावेत आणि नाफेडने थेट बाजार समित्यांमधून कांदा खरेदी करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी त्यांनी कृषी विषयक समित्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत “समिती स्थापन केली, मात्र त्या समितीने नेमके काय केले?” असा सवाल उपस्थित केला. समितीने दोन महिन्यांत अहवाल देणे अपेक्षित असताना अद्याप ठोस निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले.