‘गेस पेपर’मधील ४२ प्रश्न थेट परीक्षेत; लातूरच्या कोचिंग साम्राज्यावर संशयाची सुई

Image Source:(Internet)
पुणे-वैद्यकीय प्रवेशासाठी देशातील सर्वात महत्त्वाच्या परीक्षांपैकी एक असलेल्या NEET UG पेपरफुटी प्रकरणाने देशभरात खळबळ उडवली आहे. राजस्थानातून उघडकीस आलेल्या या घोटाळ्याचे धागेदोरे आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचले असून केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) पुणे, नांदेड आणि लातूर येथे मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत लातूरमधील प्रसिद्ध RCC कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज माटेगावकर यांना अटक करण्यात आली.
सीबीआयच्या २८ अधिकाऱ्यांच्या पथकाने लातूरमध्ये तळ ठोकत मोटेगावकरांची तब्बल ८ ते १० तास चौकशी केली. तपासादरम्यान अनेक संशयास्पद बाबी समोर आल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे RCC च्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या ‘गेस पेपर’मधील तब्बल ४२ प्रश्न NEET परीक्षेत जसेच्या तसे आल्याने संशय अधिक गडद झाला आहे.
अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबातून आलेल्या मोटेगावकरांचा प्रवास संघर्षमय राहिला आहे. रेणापूर तालुक्यातील ग्रामीण पार्श्वभूमीतून शिक्षणासाठी ते लातूरला आले. शिक्षण घेत असतानाच त्यांनी घरखर्च आणि स्वतःचे शिक्षण भागवण्यासाठी होम ट्युशन घेण्यास सुरुवात केली. नंतर केमिस्ट्री विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून त्यांनी महाविद्यालयात तासिका तत्त्वावर अध्यापन केले.
याच काळात त्यांनी ‘रेणुकाई कोचिंग क्लासेस’ अर्थात RCC ची स्थापना केली. सुरुवातीला केवळ केमिस्ट्री विषयापुरता मर्यादित असलेला क्लास पुढे “सर्व विषय एकाच छताखाली” या संकल्पनेवर विस्तारला. नामांकित शिक्षकांना जोडत RCC ने अल्पावधीतच मोठे नेटवर्क उभे केले. आज या कोचिंग संस्थेची वार्षिक उलाढाल जवळपास १०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जाते.
कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण आणि डिजिटल मार्केटिंगचा मोठ्या प्रमाणात वापर करत RCC ने लातूरबरोबरच नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि पुणेपर्यंत आपले जाळे विस्तारले. “आमच्या नोट्स आणि गेस पेपरमधील प्रश्न थेट परीक्षेत येतात,” अशी जाहिरात RCC कडून सातत्याने केली जात होती.
मात्र आता त्याच ‘गेस पेपर’मधील प्रश्न परीक्षेत आल्याने हा केवळ योगायोग होता की पेपरफुटीशी संबंधित मोठे रॅकेट, याचा तपास सीबीआयकडून सुरू आहे. त्यामुळे राज्यातील कोचिंग उद्योगासह शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.