प्रेमानंद महाराजांची प्रकृती खालावली; पदयात्रा आणि खाजगी दर्शन तात्पुरते बंद

    18-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

वृंदावन : प्रसिद्ध आध्यात्मिक संत प्रेमानंद महाराज यांची प्रकृती अचानक बिघडल्याने भक्तांमध्ये चिंता पसरली आहे. वाढत्या आजारपणामुळे त्यांची मध्यरात्रीची पदयात्रा तसेच भक्तांसाठी होणारे खाजगी दर्शन पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केली कुंज आश्रमातील केली कुंज आश्रम प्रशासनाने रविवारी रात्री भाविकांना याबाबत माहिती दिली. नेहमीप्रमाणे हजारो भाविक दर्शनासाठी पहाटे तीन वाजता उपस्थित होते, मात्र त्यांना संतांच्या प्रकृतीबाबत सूचना देऊन परत जाण्याचे आवाहन करण्यात आले.

महाराज गेल्या अनेक वर्षांपासून मूत्रपिंडाच्या आजाराशी झुंज देत असून डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे दैनंदिन पदयात्रा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. एरवी ही पदयात्रा केली कुंज ते सौभरी वन या मार्गावर पार पडत असून हजारो ते लाखो भाविक त्यांच्या दर्शनासाठी गर्दी करतात.

दर्शन रद्द झाल्याने बाहेरून आलेल्या भाविकांना निराश होऊन परतावे लागले. अनेक भक्तांनी महाराज लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना केली असून राधाराणीला साकडे घातले आहे.

उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील नरवाल तालुक्यातील अखरी गावात जन्मलेल्या महाराजांचे मूळ नाव अनिरुद्ध कुमार पांडे होते. लहानपणापासून अध्यात्माची ओढ असलेल्या अनिरुद्ध यांनी गृहत्याग करून वृंदावन गाठले आणि पुढे राधावल्लभ संप्रदाय स्वीकारत आध्यात्मिक मार्गावर आपले जीवन समर्पित केले.