बिहारमधील सासाराम रेल्वे स्थानकावर उभी असलेल्या प्रवासी गाडीच्या डब्याला आग; एक कोच जळून खाक

    18-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

बिहारमधील सासाराम रेल्वे स्थानकावर सोमवारी पहाटे मोठी दुर्घटना टळली. स्थानकावर उभी असलेल्या प्रवासी रेल्वेच्या एका डब्याला अचानक आग लागल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.

माहितीनुसार, सासारामहून पाटण्याकडे जाणारी प्रवासी रेल्वे स्टेशनवर थांबलेली असताना पहाटे सुमारे ५.५० वाजण्याच्या सुमारास एका डब्यातून धूर निघताना दिसला. काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, तोपर्यंत ट्रेनचा पाचवा डबा पूर्णपणे जळून खाक झाला होता. आग इतर डब्यांपर्यंत पोहोचू नये म्हणून संबंधित डबा त्वरित रेल्वेपासून वेगळा करण्यात आला.

प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून, घटनेनंतर गाडी सासाराम स्थानकावरच थांबवण्यात आली आहे.

दरम्यान, रविवारी मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातही अशाच प्रकारची घटना घडली होती. तिरुवनंतपुरमहून हजरत निजामुद्दीनकडे जाणाऱ्या एक्स्प्रेसच्या एका डब्याला आग लागल्याने रेल्वे तातडीने थांबवण्यात आली होती. त्या घटनेत ६८ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले होते. त्यामुळे दिल्ली-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता.