
Image Source:(Internet)
पंढरपूर : राज्यातील मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना पुन्हा वेग आला असताना प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ मोठे विधान केले आहे. राज्यात आज जनमत चाचणी घेतली, तर मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक पसंती शिंदेंनाच मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना कडू म्हणाले की, सर्वसामान्य नागरिकांशी थेट संपर्क आणि सातत्यपूर्ण जनसंपर्कामुळे शिंदे हे जनतेच्या अधिक जवळचे नेते ठरले आहेत. “राज्याची भावना पुन्हा शिंदेंना मुख्यमंत्रीपदी पाहण्याची आहे. ही इच्छा आता केवळ देवापुढे नव्हे, तर जनतेसमोर मांडणार,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी राज्यातील शेती धोरणांवरही भाष्य केले. महाराष्ट्रातील विविध विभागांमध्ये शेतकऱ्यांच्या समस्या वेगवेगळ्या असल्याने विभागनिहाय कृषी धोरण तयार करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांसाठी ठोस आणि प्रभावी निर्णय घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मुंबईत आंबा आणि काजू उत्पादकांच्या प्रश्नांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या कारवाईवरही कडूंनी नाराजी व्यक्त केली. आंदोलनादरम्यान राजू शेट्टी ,महादेव जानकर यांच्यासह इतर नेत्यांना ताब्यात घेतल्याचा निषेध करत आंदोलन करणे हा लोकशाही हक्क असल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटीलयांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवरही बच्चू कडूंनी भूमिका स्पष्ट केली. यापुढे कोणत्याही एका समाजापुरते आंदोलन न करता शेतकरी, दिव्यांग आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर व्यापक पातळीवर काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.