नागपुरात पुन्हा रक्तरंजित घटना; एमआयडीसी परिसरात युवकाची दगडाने ठेचून हत्या

    18-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत असतानाच एमआयडीसी परिसरातून आणखी एक खळबळजनक हत्या समोर आली आहे. इसासनी माधवनगरी येथील दर्ग्याजवळ 32 वर्षीय युवकाचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अज्ञात व्यक्तींनी डोक्यात दगड घालून युवकाची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मृत युवकाचे नाव अंकुश किशोर शेंडे (वय 32, रा. पंचशील नगर, इसासनी) असे आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकुश सायंकाळच्या सुमारास परिसरात दिसला होता. मात्र रात्री दर्ग्याजवळ त्याचा मृतदेह पडलेला आढळल्याने एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तत्काळ एमआयडीसी पोलिसांना याची माहिती दिली.

घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. युवकाच्या डोक्यावर गंभीर मारहाण झाल्याचे तपासात समोर आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, याचा तपास सुरू असून पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकेही कामाला लागली आहेत.