
Image Source:(Internet)
चीन: दक्षिण चीनमध्ये सोमवारी सकाळी झालेल्या भूकंपामुळे मोठी खळबळ उडाली. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ५.२ इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाच्या धक्क्यांमुळे अनेक इमारतींना तडे गेले असून काही इमारती कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.
भूकंपाचे केंद्र लिउझोऊ शहराजवळ असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. हादरे जाणवताच अनेक नागरिक घराबाहेर धावत आले. प्रशासनाने तातडीने बचाव पथके घटनास्थळी पाठवली असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध सुरू आहे.
सरकारी वृत्तसंस्था सीसीटीव्हीच्या माहितीनुसार, भूकंपामुळे किमान १३ इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक जण जखमी झाले असून त्यापैकी चौघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने जखमींची प्रकृती गंभीर नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
सुरक्षेच्या कारणास्तव ७ हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. भूकंपानंतर रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून, तपासणी पूर्ण होईपर्यंत काही मार्गांवरील सेवा तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, वीजपुरवठा, पाणीपुरवठा आणि गॅस सेवा सुरळीत असल्याचे प्रशासनाने सांगितले. बाधित इमारतींपासून दूर राहण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले असून, मदत व बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.