
Image Source:(Internet)
पुणे : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना पुन्हा एकत्र आणण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असतानाच पुण्यात शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांची एक गुप्त बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अजित पवार गटाची सूत्रे सुनेत्रा पवार यांनी आपल्या हाती घेतली. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू असल्याचे संकेत शरद पवार यांनी यापूर्वी दिले होते. आमदार रोहित पवार यांनीही अनेकदा याबाबत सकारात्मक भूमिका मांडली होती. मात्र, अजित पवार गटातील नेत्यांनी अशा कोणत्याही चर्चांना अधिकृत दुजोरा दिला नव्हता.
दरम्यान, पुण्यात झालेल्या गुप्त बैठकीमुळे या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे. विशेष म्हणजे ही बैठक पक्ष कार्यालयात न होता एका खासगी हॉटेलमध्ये झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या बैठकीत विलीनीकरणासह आगामी राजकीय रणनीतीवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
या बैठकीला माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील तसेच पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम उपस्थित होते. बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील सध्याच्या राजकीय घडामोडींवर चिंतन करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची घेतलेली भेटही चर्चेचा विषय ठरली आहे. तब्बल दोन वर्षांनंतर तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले. मात्र, माध्यमांशी बोलताना त्यांनी ही भेट केवळ शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी असल्याचे स्पष्ट केले.
पुण्यातील बैठकीनंतर काही नेत्यांचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र येणार का? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चिला जात आहे.