
Image Source:(Internet)
मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांचा परिणाम आता राज्य परिवहन महामंडळावरही दिसू लागला आहे. वाढत्या इंधन खर्चामुळे एसटी महामंडळावर आर्थिक भार वाढत असून, भविष्यात प्रवासी भाडेवाढीचा निर्णय घ्यावा लागू शकतो, असे संकेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
अमेरिका-इराण संघर्षामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. स्ट्रेट ऑफ हॉर्मुज मार्गावरील तणावामुळे तेलपुरवठ्यावर परिणाम झाला असून, त्याचे पडसाद भारतातही उमटत आहेत. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ केल्यानंतर महागाईचा दबाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “इंधन दरवाढीमुळे एसटी महामंडळाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. सध्या तिकिट दर वाढवलेले नाहीत, मात्र परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यात दरवाढीचा निर्णय घ्यावा लागू शकतो.”
राज्यात इलेक्ट्रिक बस सेवा वाढवण्यावर सरकारचा भर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. एसटी महामंडळाच्या डेपोमध्ये चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू असून, पुढे या सुविधांचा वापर खासगी वाहनांसाठीही उपलब्ध करून देण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबतही त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. “छावा” नावाचे नवीन ॲप सुरू करण्यात येणार असून, त्याद्वारे कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर जमा केले जाईल. तसेच प्रलंबित थकबाकीही टप्प्याटप्प्याने देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवांवर सरकार कठोर भूमिका घेणार असल्याचेही सरनाईक यांनी सांगितले. संबंधित ॲप्सविरोधात सायबर सेल आणि डीजी कार्यालयाशी पत्रव्यवहार सुरू असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, इंधन बचतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रशासनातही खर्च कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. धाराशिव जिल्ह्याच्या विविध कामांचा आढावा घेण्यासाठी प्रत्यक्ष बैठक न घेता ऑनलाइन माध्यमातून बैठक आयोजित करण्यात आल्याची माहितीही प्रताप सरनाईक यांनी दिली.