मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू; परदेशात भारतीय १००० रुपयांची नेमकी किती किंमत?

    15-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : पंतप्रधान मोदी यांनी १५ मेपासून पाच देशांच्या महत्त्वपूर्ण दौऱ्याला सुरुवात केली आहे. १५ ते २० मेदरम्यान होणाऱ्या या दौऱ्यात संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांचा समावेश आहे. या दौऱ्याकडे राजनैतिक आणि आर्थिक दृष्टीने जगाचे लक्ष लागले असतानाच भारतीयांमध्ये आणखी एक उत्सुकता पाहायला मिळत आहे — परदेशात भारतीय रुपयाची ताकद नेमकी किती?

यूएईमध्ये भारतीय रुपयाला चांगला आधार-
दौऱ्याची सुरुवात संयुक्त अरब अमिरात (UAE) पासून होत आहे. येथे पंतप्रधान मोदी राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चाही करणार आहेत. भारत आणि यूएईमधील व्यापारसंबंध दिवसेंदिवस अधिक मजबूत होत असून लाखो भारतीय तेथे वास्तव्यास आहेत. सध्याच्या चलन विनिमय दरानुसार भारताचे १००० रुपये यूएईमध्ये सुमारे ३८.३७ दिरहम इतके होतात.

नेदरलँडमध्ये रुपयाची किंमत कमी-
यूएईनंतर मोदी नेदरलँडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. युरो चलन वापरणाऱ्या या देशात भारतीय रुपयाचे मूल्य तुलनेने कमी आहे. सध्या भारताचे १००० रुपये केवळ ८.९६ युरो इतके होतात. यावरून युरोची जागतिक बाजारातील ताकद आणि युरोपियन अर्थव्यवस्थेची स्थिरता स्पष्ट होते.

स्वीडनमध्ये ‘क्रोना’समोर रुपयाची स्थिती-
स्वीडन हा युरोपियन संघाचा भाग असला तरी तेथे स्वतंत्र ‘स्वीडिश क्रोना’ चलन वापरले जाते. टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशनसाठी ओळखल्या जाणाऱ्या या देशात भारतीय १००० रुपयांचे मूल्य जवळपास ९८.३२ स्वीडिश क्रोना इतके आहे. मजबूत निर्यात आणि मोठ्या उद्योगांमुळे स्वीडनची अर्थव्यवस्था स्थिर मानली जाते.

नॉर्वेच्या करन्सीसमोरही रुपया टिकून-
ऊर्जा आणि पर्यावरणपूरक विकासाच्या दृष्टीने नॉर्वेचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. तेल आणि नैसर्गिक वायूच्या साठ्यांमुळे नॉर्वे जगातील समृद्ध देशांपैकी एक आहे. येथे वापरल्या जाणाऱ्या ‘नॉर्वेजियन क्रोन’समोर भारतीय १००० रुपयांची किंमत सुमारे ९७.११ NOK इतकी आहे.

इटलीतही युरोचाच प्रभाव-

दौऱ्याचा शेवट इटलीमध्ये होणार आहे. फॅशन, पर्यटन आणि ऑटोमोबाईल उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या इटलीमध्येही युरो चलनच वापरले जाते. त्यामुळे येथेही भारतीय १००० रुपयांची किंमत ८.९६ युरो इतकीच राहते. भारतासाठी गुंतवणूक आणि व्यापाराच्या दृष्टीने इटली महत्त्वाचा भागीदार मानला जातो.

परदेशी चलनासमोर रुपयाची खरी ताकद काय सांगते?
या सर्व आकडेवारीवरून एक गोष्ट स्पष्ट होते की, प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था, उत्पादनक्षमता, निर्यात आणि जागतिक बाजारातील स्थान यावर त्या देशाच्या चलनाची ताकद अवलंबून असते. भारतीय रुपया काही देशांमध्ये मजबूत दिसतो, तर काही ठिकाणी त्याची किंमत तुलनेने कमी आहे. मात्र भारताची वाढती अर्थव्यवस्था आणि जागतिक स्तरावरील वाढता प्रभाव यामुळे रुपयाबद्दलचा विश्वास सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे.