कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आधार; 12.35 रुपये दराने खरेदीला सुरुवात, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

    15-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदा उत्पादकांना दिलासा देत महाराष्ट्रात 12 रुपये 35 पैसे प्रतिकिलो दराने कांदा खरेदी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

सातारा येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी कांदा उत्पादकांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. “कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. या पार्श्वभूमीवर मी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याकडे कांदा खरेदी सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आजपासून राज्यात खरेदी प्रक्रिया सुरू होत आहे,” असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी ऊस उत्पादक आणि साखर उद्योगाशी संबंधित प्रश्नांवरही भाष्य केले. केंद्र आणि राज्य सरकार मिळून शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून प्रोत्साहनपर मदत दिली जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.

कार्यक्रमात केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनीही सरकारच्या योजनांबाबत माहिती दिली. “गरीब आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र आणि राज्य सरकार सातत्याने काम करत आहे. महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर घरकुलांचा लाभ मिळाला असून आता कांदा उत्पादकांसाठीही मदतीचा निर्णय घेण्यात आला आहे,” असे ते म्हणाले.

दरम्यान, उन्हाळी कांद्याचे बाजारभाव सातत्याने घसरत असल्याने राज्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आहेत. अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याला प्रतिक्विंटल फक्त 600 ते 700 रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसून शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी प्रतिक्विंटल तब्बल 1500 रुपयांपर्यंत नुकसान होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाकडे शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने पाहिले आहे.