NEET पेपरफुटी प्रकरणानंतर मोठा निर्णय; 21 जूनला होणार पुनर्परीक्षा

    15-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी NEET UG 2026 परीक्षा पेपरफुटीच्या आरोपांमुळे रद्द झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांसाठी मोठे अपडेट समोर आले आहे. National Testing Agency (NTA) ने अधिकृतपणे जाहीर केले आहे की, NEET UG ची पुनर्परीक्षा 21 जून 2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

3 मे रोजी देशभरात घेण्यात आलेल्या NEET परीक्षेनंतर राजस्थानातील सीकर भागात प्रश्नपत्रिकेशी साधर्म्य असलेला ‘गेस पेपर’ फिरत असल्याची माहिती समोर आली होती. या गेस पेपरमधील अनेक प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत विचारण्यात आल्याचा दावा करण्यात आला. प्राथमिक तपासात काही प्रश्न अक्षरशः जुळल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली होती.

विशेष म्हणजे, रसायनशास्त्र विषयातील अनेक प्रश्न साम्य असल्याचे समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी परीक्षा प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. अखेर वाढता दबाव आणि चौकशी अहवाल लक्षात घेऊन NTA ने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, पुनर्परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसणार आहे. यापूर्वी भरलेले अर्ज आणि माहितीच वैध मानली जाणार असल्याचे NTA ने स्पष्ट केले आहे. तसेच विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त परीक्षा शुल्क घेतले जाणार नाही.

नवीन तारखेनुसार विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेशपत्र जारी करण्यात येणार असून ते अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जातील. परीक्षा केंद्रांबाबत अंतिम निर्णय अद्याप जाहीर करण्यात आलेला नसला तरी पूर्वी निवडलेले पर्याय विचारात घेतले जाणार असल्याची माहिती आहे.

पेपरफुटीच्या या प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत चिंता निर्माण झाली होती. आता पुनर्परीक्षेची तारीख जाहीर झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.