
Image Source:(Internet)
मुंबई : आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून मुंबईत मोठा संघर्ष पाहायला मिळाला. कोकणातील बागायतदारांनी गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’पर्यंत मोर्चा काढला. मात्र आंदोलनादरम्यान परिस्थिती तणावपूर्ण बनली असून पोलिसांनी अनेक प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतले आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी नेते राजू शेट्टी, विनायक राऊत आणि महादेव जानकर यांनी केले. मोर्चा काढू नये यासाठी पोलिसांकडून आधीच नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. तरीही आंदोलकांनी माघार न घेता मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
मोर्चा वर्षा बंगल्याजवळ पोहोचल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी कारवाई करत राजू शेट्टी, विनायक राऊत, महादेव जानकर आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले.
विशेष म्हणजे, महादेव जानकर यांना पोलिसांनी उचलून नेतानाचे दृश्य आंदोलनस्थळी पाहायला मिळाले. या घटनेमुळे आंदोलकांमध्ये संताप वाढला असून आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना योग्य हमीभाव, नुकसानभरपाई आणि विविध सवलती मिळाव्यात, या मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मात्र प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतर आता राज्यभरातून या कारवाईविरोधात प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.