महागाईचा जबरदस्त फटका; दोन दिवसांत इंधन, दूध, सोनं-चांदीसह जीवनावश्यक खर्च वाढला

    15-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : देशभरातील नागरिकांना महागाईचा मोठा धक्का बसला असून गेल्या 48 तासांत अनेक अत्यावश्यक वस्तू आणि सेवांच्या दरात वाढ झाली आहे. सोनं-चांदीपासून दूध, पेट्रोल-डिझेल आणि सीएनजीपर्यंत विविध वस्तू महागल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडू लागले आहे.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना सोन्याची खरेदी टाळण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर सरकारने सोन्या-चांदीवरील आयात शुल्क वाढवले आणि त्याचा थेट परिणाम बाजारभावावर झाला. सोन्याच्या किंमतीत तब्बल 11 हजार रुपयांची वाढ झाली, तर चांदीही सुमारे 22 हजार रुपयांनी महागली.

दरम्यान, दूध उत्पादक कंपन्यांनीही ग्राहकांना झटका दिला आहे. Amul आणि Mother Dairy यांनी दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ जाहीर केली असून नवीन दर 14 मेपासून लागू झाले आहेत.

इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तेल कंपन्यांनी 15 मेपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर 3 रुपयांची वाढ केली आहे. यानंतर मुंबईत पेट्रोल 106.68 रुपये प्रति लिटर तर डिझेल 93.14 रुपये प्रति लिटर झाले आहे.

यासोबतच सीएनजीच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे खर्च वाढणार असून त्याचा परिणाम सर्वसामान्य प्रवाशांवरही होण्याची शक्यता आहे. दिल्लीत सीएनजीचा दर आता 79.09 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

सततच्या दरवाढीमुळे घरगुती बजेटवर ताण वाढत असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.