
Image Source:(Internet)
पुणे : इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशात आर्थिक मंदीचे सावट निर्माण होण्याची शक्यता असल्याचा गंभीर इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. देशातील वाढती आर्थिक अनिश्चितता, रुपयाची घसरण आणि इंधन बचतीची गरज यावर भाष्य करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवून सर्वांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी केली.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले की, पंतप्रधानांनी इंधन बचतीचे केलेले आवाहन योग्य असले तरी त्यात सातत्य असणे अधिक महत्त्वाचे आहे. काही मंत्री गाड्यांचे ताफे कमी करत आहेत, काही पायी किंवा दुचाकीने प्रवास करत असल्याचे दिसत असले तरी केवळ दिखाऊ कृतींनी परिस्थिती बदलणार नाही, असा टोला त्यांनी लगावला.
निवडणुकांच्या काळात सत्ताधाऱ्यांना इंधन बचतीची आठवण का झाली नाही, असा सवालही पवार यांनी उपस्थित केला. जनतेमध्ये त्यावेळी जागरूकता निर्माण करणे गरजेचे होते, मात्र तसे झाले नसल्याचे त्यांनी नमूद केले.
देशातील आर्थिक परिस्थिती गंभीर असल्याचे सांगताना पवार म्हणाले की, रुपयाची घसरण आणि वाढत्या खर्चाचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. सोन्याच्या खरेदीला विरोध नसला तरी अनावश्यक खर्च टाळण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आर्थिक मंदी टाळण्यासाठी नागरिकांनीही जबाबदारीने वागावे, असे आवाहन त्यांनी केले.
पंतप्रधान संसदेत फारसे उपस्थित राहत नसल्याची टीका करताना त्यांनी सांगितले की, देशाच्या प्रमुखांनी सातत्याने संसदेत आणि सर्वपक्षीय बैठकींमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबत काही मुख्यमंत्र्यांनी वापरलेली भाषा अयोग्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
स्वतःच्या ताफ्याबाबत बोलताना पवार म्हणाले की, गेल्या चार वर्षांपासून त्यांच्या ताफ्यात केवळ तीन गाड्या आहेत. बुलेटप्रूफ वाहन नाकारून स्वतःची गाडी वापरत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, काही राज्यांतील निवडणुकांचे निकाल अपेक्षेप्रमाणे लागले नसल्याचे मान्य करत त्यांनी नव्या पक्षांना काँग्रेसने दिलेल्या पाठिंब्यामुळे इंडिया आघाडीत काही प्रमाणात नाराजी असल्याचे सांगितले. मात्र, ती दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.