
Image Source:(Internet)
नागपूर : शहरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस अधिकच भयावह होत चालली असून एमआयडीसी परिसरात पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने खळबळ उडाली आहे. आधार नगरी, इसासनी परिसरात एका अज्ञात युवकाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. अज्ञात आरोपींनी डोक्यावर दगडाने वार करत युवकाची निर्घृण हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
आज सकाळच्या सुमारास ११२ हेल्पलाईनवरून घटनेची माहिती मिळताच नागपूर पोलीस यांच्या एमआयडीसी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसर बंदोबस्तात घेत पंचनामा केला तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकल रुग्णालयात पाठवला.
प्राथमिक तपासात युवकाच्या डोक्यावर मोठ्या दगडाने वार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. खून करून आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून संशयित हालचालींचा मागोवा घेतला जात आहे.
मृत युवकाची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिस स्थानिकांकडून माहिती गोळा करत आहेत. या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँच आणि एमआयडीसी पोलिसांकडून सुरू आहे.
या घटनेनंतर आधार नगरी आणि इसासनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.