
Image Source:(Internet)
मुंबई : NEET-UG २०२६ परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने देशभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर कठोर शब्दांत निशाणा साधत शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
सोशल मीडियावर व्यक्त झालेल्या प्रतिक्रियेत राज ठाकरे म्हणाले की, “२२ लाख विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे भविष्य अनिश्चिततेत ढकलले गेले आहे. या परिस्थितीस जबाबदार कोण?” त्यांनी NEET परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत केंद्र सरकारवर निष्काळजीपणाचा आरोप केला.
राज ठाकरे यांनी पेपरफुटी प्रकरणामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला. प्रश्नपत्रिका लाखो रुपयांत विकल्या जात असल्याच्या चर्चा समोर येत असून, काही कोचिंग क्लासेसचाही या प्रकारात सहभाग असू शकतो, असा दावा त्यांनी केला. “फक्त सीबीआय चौकशी जाहीर करून सरकार जबाबदारीतून मुक्त होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांवर झालेल्या मानसिक ताणाचं काय?” असा सवाल त्यांनी केला.
२०१६ पासूनच NEET परीक्षेला विरोध करत असल्याचे सांगत त्यांनी एकसमान राष्ट्रीय परीक्षेच्या संकल्पनेवरही टीका केली. आर्थिकदृष्ट्या सक्षम विद्यार्थ्यांना महागड्या कोचिंग क्लासेसचा फायदा मिळतो, तर ग्रामीण आणि सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचे त्यांनी म्हटले.
दक्षिणेकडील राज्यांनीही NEET विरोधात भूमिका घेतल्याचा उल्लेख करत त्यांनी महाराष्ट्र सरकारनेही ठाम भूमिका घ्यावी, अशी मागणी केली. “राज्यातील मेडिकल कॉलेजमध्ये स्थानिक विद्यार्थ्यांना प्राधान्य नसेल, तर राज्य सरकारने याबाबत स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे,” असे ते म्हणाले.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर टीका करत राज ठाकरे यांनी वारंवार होत असलेल्या गोंधळासाठी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली. “विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, इंधन बचतीसारख्या उपक्रमांच्या प्रसिद्धीपेक्षा विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि भवितव्याच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला.