
Image Source:(Internet)
नागपूर: राज्यातील लाखो वाहनधारकांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक अर्थात HSRP नंबर प्लेट बसवण्याच्या मुदतीत राज्य सरकारने वाढ केली आहे. परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांनी याबाबत घोषणा केली असून आता वाहनधारकांना ३० जून २०२६ पर्यंत HSRP प्लेट बसवता येणार आहे.
यापूर्वी या प्रक्रियेसाठी ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र, राज्यभरातील वाहनांची संख्या आणि नागरिकांची संभाव्य गैरसोय लक्षात घेता सरकारने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहनधारकांना आता अतिरिक्त सहा महिन्यांचा अवधी मिळाला आहे. मात्र, १ जुलै २०२६ पासून HSRP नंबर प्लेट अनिवार्य करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वाहन सुरक्षेला अधिक सक्षम करण्यासाठी HSRP प्रणाली लागू करण्यात आली आहे. या प्लेट्समध्ये विशेष सुरक्षा वैशिष्ट्ये असल्याने त्या सहज बदलता येत नाहीत. त्यामुळे वाहन चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार आहे. तसेच बनावट नंबर प्लेट वापरणे कठीण होणार असून गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाहनांचा गैरवापर रोखण्यासाठीही ही प्रणाली प्रभावी ठरणार आहे.
परिवहन विभागाने वाहनधारकांना अधिकृत संकेतस्थळावरूनच नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. HSRP बसवण्यासाठी आगाऊ स्लॉट बुक करून प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. कोणत्याही एजंट किंवा अनधिकृत व्यक्तींच्या आमिषाला बळी पडू नये, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
“३० जून २०२६ पूर्वी सर्व वाहनधारकांनी HSRP प्लेट बसवण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. त्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाऊ शकते,” असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.