
Image Source:(Internet)
जळगाव : जिल्ह्यात उष्णतेची लाट तीव्र झाली असून वाढत्या तापमानाचा फटका नागरिकांच्या आरोग्यावर जाणवत आहे. उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असताना आता एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
चोपडा तालुक्यातील खामखेडा येथे उष्माघाताचा संशय असलेल्या घटनेत 20 वर्षीय नवविवाहितेचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील मोहाडी येथील वैशाली सुनील मोरे (भील) ही नवविवाहित तरुणी पतीसोबत नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी खामखेडा येथे गेली होती. कार्यक्रम आटोपल्यानंतर घरी परतल्यानंतर तिला अचानक चक्कर आली आणि ती खाली कोसळली. उष्माघाताची लक्षणे दिसू लागल्याने तिला तातडीने नेरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र प्रकृती गंभीर झाल्याने तिला जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात येत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला.
विशेष म्हणजे, वैशालीचा विवाह 23 एप्रिल रोजी झाला होता. लग्नाला अवघे 20 दिवस झाले असतानाच तिच्या निधनाने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, राज्यात उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून आतापर्यंत 175 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने नागरिकांना दुपारच्या तीव्र उन्हात बाहेर न पडण्याचे आणि पुरेशी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.