CBSE 12वी निकाल 2026 जाहीर; 85.20 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

    13-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) इयत्ता 12वीचा 2026 चा निकाल अधिकृतपणे जाहीर केला आहे. यंदा देशभरातील लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली असली, तरी निकालाच्या टक्केवारीत घसरण झाल्याचे चित्र समोर आले आहे. यावर्षी 85.20 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, मागील वर्षी हा आकडा 88.39 टक्के होता.

यंदाच्या परीक्षेला 18.5 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने निकाल प्रक्रियेस थोडा विलंब झाला. मात्र, उत्तरपत्रिकांची तपासणी डिजिटल पद्धतीने करण्यात आल्याने निकाल अधिक अचूक आणि पारदर्शक असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे.

निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी संकेतस्थळांवर गर्दी केली. आता बारावीनंतरच्या महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेलाही वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विद्यार्थ्यांना CBSEच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन “Class 12 Result 2026” या लिंकवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर रोल नंबर, स्कूल कोड आणि अॅडमिट कार्डवरील आवश्यक माहिती भरल्यानंतर निकाल पाहता येणार आहे.

CBSEने विद्यार्थ्यांसाठी डिजिलॉकरवर डिजिटल मार्कशीटची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थी DigiLocker अॅप किंवा वेबसाईटवर लॉगिन करून रोल नंबर आणि पासिंग इयर टाकल्यानंतर मार्कशीट डाउनलोड करू शकतात.

दरम्यान, 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही यंदा वाढल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे.