
Image Source:(Internet)
नागपूर :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोन्याची खरेदी टाळा, परदेश दौरे पुढे ढकला तसेच पेट्रोल-डिझेलचा वापर मर्यादित करा, असे केलेल्या आवाहनानंतर देशभरात चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारला सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचा सल्ला दिला आहे.
पवार यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, पंतप्रधानांच्या अचानक झालेल्या घोषणांमुळे सामान्य नागरिक, उद्योग क्षेत्र आणि गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या निर्णयांचा अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो, त्यामुळे सरकारने अधिक संवेदनशीलतेने परिस्थिती हाताळण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवर सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घेणे आवश्यक असल्याचे सांगत पवार यांनी पंतप्रधानांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली तातडीने सर्वपक्षीय बैठक घ्यावी, अशी मागणी केली. तसेच केवळ राजकीय नेतेच नव्हे तर अर्थतज्ज्ञ, उद्योग प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशीही चर्चा करून पुढील निर्णय घ्यावेत, असे त्यांनी सुचवले.
दोन दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती आणि त्याचा जागतिक पुरवठा साखळीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन नागरिकांना इंधनाचा वापर कमी करण्याचे आवाहन केले होते. विदेशी चलन साठा टिकवण्यासाठी सोन्याची खरेदी टाळण्यासह अनावश्यक परदेश दौरे पुढे ढकलण्याचा सल्लाही त्यांनी दिला होता. तसेच खाद्यतेल आणि खतांच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले होते.