
Image Source:(Internet)
अमेरिका-इराण संघर्षामुळे जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना इंधन बचतीसोबतच काही काळ सोनं खरेदी टाळण्याचं आवाहन केलं आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होत असून, स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधील समुद्री वाहतुकीतही अडथळे निर्माण झाल्याची परिस्थिती आहे.
एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांनी पुढील एक वर्ष सोन्याची खरेदी टाळावी, असे आवाहन केले. या वक्तव्यावर ज्वेलरी उद्योगातूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी असोसिएशनचे अध्यक्ष Rajesh Rokde यांनी यावर भाष्य करताना, “देशहिताचा विचार महत्त्वाचा असला तरी सोन्याची खरेदी पूर्णपणे थांबवणे व्यवहार्य नाही,” असे मत व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, देशाच्या अर्थव्यवस्थेत ज्वेलरी उद्योगाचा मोठा वाटा असून, जीडीपीमध्ये या क्षेत्राचे सुमारे ७ टक्के योगदान आहे. या उद्योगाशी थेट आणि अप्रत्यक्षपणे लाखो कारागीर व छोटे व्यवसाय जोडलेले आहेत. देशभरात ७० लाखांपासून ते १ कोटींपर्यंत कारागीर या क्षेत्रावर अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले.
“जर सोन्याची खरेदी पूर्णपणे बंद झाली, तर केवळ ज्वेलरी व्यवसायच नव्हे तर त्यासोबत जोडलेले अनेक लघुउद्योगही संकटात येतील. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण होण्याची शक्यता आहे,” असा इशाराही राजेश रोकडे यांनी दिला.